मुंबई: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCC) प्रकल्पाच्या पायाभूत कामासाठी मध्य रेल्वेने पनवेल आणि कळंबोली स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक रविवार, २५ जानेवारी रोजी रात्री घेण्यात येणार असून, यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक मुळे शनिवार – रविवार आणि लागून आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत गावी जाणार्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
ब्लॉकचे मुख्य कारण
कळंबोली येथे ११० मीटर लांबीच्या (१५०० मेट्रिक टन वजन) ‘ओपन वेब गर्डर’ उभारणीचे काम केले जाणार आहे. यासाठी पनवेल-कळंबोली दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर मध्यरात्री १:२० ते पहाटे ५:२० वाजेपर्यंत असा एकूण चार तासांचा ब्लॉक असेल.
गाड्यांच्या मार्गात आणि वेळेत झालेले बदल:
या कामामुळे अनेक महत्त्वाच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. मार्गात बदल (Diverted Train):
गाडी क्र. २२१९३ (दौंड – ग्वाल्हेर एक्सप्रेस): ही गाडी कर्जत – कल्याण – वसई रोड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
२. स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येणाऱ्या गाड्या (Regulated Trains):
गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू – सीएसएमटी एक्सप्रेस): ही गाडी सोमाटणे स्थानकादरम्यान रात्री २:५८ ते पहाटे ५:२० पर्यंत थांबवून ठेवली जाईल.
गाडी क्र. २०११२ (मडगाव – सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेस): ही गाडी पनवेल येथे पहाटे ४:०२ ते ५:२० पर्यंत थांबवली जाईल.
गाडी क्र. ११००४ (सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस): ही गाडी आपटा स्थानकात पहाटे ४:२५ ते ५:१५ पर्यंत थांबवण्यात येईल.
गाडी क्र. १२६२० (मंगळुरू – एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस): ही गाडी जिते स्थानकात पहाटे ४:४१ ते ५:१० पर्यंत थांबवली जाईल.
३. वेळेत बदल आणि उशीर:
गाडी क्र. १०१०३ (सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस): या गाडीच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही गाडी सीएसएमटी येथून सकाळी ८:२० वाजता सुटेल.
गाडी क्र. १७३१७ (हुबळी – दादर एक्सप्रेस): ही गाडी १५ ते २० मिनिटे उशिराने धावेल.
प्रवाशांना आवाहन
या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार असून, तुतारी, मांडवी आणि कोकण कन्या यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर गाड्यांची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


