सण साजरा करण्यासाठी आनंदाने घरी आलेल्या दोन तरुण इंजिनिअर्सवर काळाने झडप घातली आहे. संक्रांतीच्या उत्सवात बिअर पिण्याची लावलेली एक जीवघेणी स्पर्धा या तरुणांच्या जीवावर बेतली. अतिमद्यप्राशनामुळे या दोन्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिकुमार (वय ३५) आणि पुष्पराज (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. मणिकुमार हे चेन्नईमध्ये तर पुष्पराज बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. संक्रांतीचा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी ते आपल्या बंदावद्दीपल्ले या गावी आले होते.
सणाच्या उत्साहात मित्रांसोबत मद्यप्राशन करत असताना, त्यांच्यात बिअर पिण्याची स्पर्धा लागली. ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात दोघांनीही मर्यादेपेक्षा जास्त मद्यप्राशन केले. काही वेळातच दोघेही जागीच बेशुद्ध पडले.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
दोघेही बराच वेळ शुद्धीवर येत नसल्याने घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शरीरात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अल्कोहोल गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
गावावर शोककळा, कुटुंबाचा आधार हरपला
या घटनेमुळे संपूर्ण बंदावद्दीपल्ले गावावर शोककळा पसरली आहे.
मणिकुमार यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी आणि दोन वर्षांच्या लहान मुलाचा आधार हरपला आहे.
पुष्पराज हा तरुण अविवाहित होता आणि नुकताच करिअरमध्ये स्थिरावत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेने मद्यप्राशनाच्या अतिरेकाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.


