सिंधुदुर्ग | प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सिंधुदुर्गातील जागरूक मतदारांनी विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार, अशी ठाम भूमिका मतदारांनी खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे.
केवळ रस्ते, वीज व पाणी यापुरते न थांबता जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मतदारांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार, टर्मिनस पूर्ण झाल्यास मुंबई–पुण्याहून थेट रेल्वे सेवा सुरू होऊन ‘वीकेंड टुरिझम’ला मोठी चालना मिळेल. शिरोडा, वेंगुर्ला, देवगड, मालवण यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढेल. एका खासगी सर्वेक्षणानुसार दररोज ५०० नवीन पर्यटक आले, तरी वर्षाला सुमारे ५४ कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. याशिवाय येथे प्रस्तावित ३९ कोटींच्या ‘रेल्वे बजेट हॉटेल’चे काम निधीअभावी रखडले असून तेही पूर्ण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा व वेंगुर्ल्याचा काजू महागड्या ट्रकमार्गे वाशी मार्केटला पाठवावा लागतो. टर्मिनस सुरू झाल्यास रेल्वेमार्गे कमी खर्चात व कमी वेळेत मालवाहतूक शक्य होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढेल.
तरुणांसाठी स्थानिक रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत म्हणूनही टर्मिनसकडे पाहिले जात आहे. गाड्यांची सफाई, पाणी भरणे, देखभाल आदी कामांतून स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या योजनेमुळे महिला बचत गट व लाकडी खेळणी व्यवसायाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होईल.
दरम्यान, टर्मिनससाठी आवश्यक असलेला अप्रोच रोड सुमारे ९० टक्के पूर्ण झाला असला, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप लालफितीत अडकलेला आहे. तिलारी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत १५ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास टर्मिनससह मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
गेल्या दहा वर्षांत केवळ भूमिपूजन झाल्या असून आता प्रत्यक्ष पूर्तता हवी, असा निर्वाणीचा इशारा मतदारांनी दिला आहे. जो उमेदवार आपल्या अधिकृत जाहीरनाम्यात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व रेलोटेल प्रकल्प’ पूर्ण करण्याचे स्पष्ट वचन देईल आणि निवडून आल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करेल, त्यालाच मत दिले जाईल, असा निर्धार या खुल्या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणच्या स्वाभिमानाशी जोडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या ‘व्हिजन’मध्ये याला अग्रक्रम द्यावा, अशी अपेक्षा सिंधुदुर्गातील मतदार व्यक्त करत आहेत.


