नवी दिल्ली:
देशातील बहुप्रतिक्षित ‘जनगणना २०२७’ बाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला अधिकृतरीत्या सुरुवात होणार असून, केंद्र सरकारने यासाठी आवश्यक असलेल्या ३३ प्रश्नांची अधिसूचना (Gazette Notification) जारी केली आहे.
दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया
भारत सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, जनगणना प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांत पार पडणार आहे:
१. पहिला टप्पा (एप्रिल ते सप्टेंबर २०२६): या टप्प्यात ‘घरयादी’ (House Listing) आणि ‘गृहगणना’ (Housing Census) केली जाईल.
२. दुसरा टप्पा (फेब्रुवारी २०२७): या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना (Population Enumeration) केली जाणार आहे.
३३ प्रश्नांद्वारे गोळा केली जाणार माहिती
केंद्र सरकारने जनगणनेसाठी ३३ प्रश्नांची एक यादी तयार केली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश असेल:
घराची माहिती: घराचा नंबर, भिंती आणि छतासाठी वापरलेले साहित्य, पिण्याच्या पाण्याचा स्रोत, शौचालयाची उपलब्धता.
कुटुंबाची माहिती: कुटुंबातील सदस्यांची संख्या, प्रमुखाचे नाव, कुटुंबाकडे असलेली मालमत्ता (रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप, सायकल, कार इ.).
डिजिटल कनेक्टिव्हिटी: इंटरनेट सुविधा, मोबाईल/स्मार्टफोनची उपलब्धता.
इतर: स्वयंपाकाचे इंधन आणि संवादासाठी मोबाईल क्रमांक.
’स्व-गणना’ (Self-Enumeration) चा पर्याय उपलब्ध
यावेळी जनगणनेत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे. प्रगणक (Enumerator) घरी येण्यापूर्वी १५ दिवस नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक स्वतःहून आपली माहिती ऑनलाइन नोंदवू शकतील.
राज्यांना ३० दिवसांची मुदत
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२६ या ६ महिन्यांच्या कालावधीत आपल्या सोयीनुसार ३० दिवसांचा कोणताही एक कालावधी निवडून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
महत्त्वाची टीप: जनगणनेचे हे काम ‘जनगणना अधिनियम, १९४८’ अंतर्गत केले जात असून, गोळा केलेली माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
जनगणना २०२७: ३३ प्रश्नांची यादी
१. भवन क्रमांक (नगर किंवा स्थानिक प्राधिकरण)
२. जनगणना मकान नंबर
३. घराच्या जमिनीसाठी वापरलेले साहित्य
४. घराच्या भिंतीसाठी वापरलेले साहित्य
५. घराच्या छतासाठी वापरलेले साहित्य
६. घराचा वापर (निवासी/व्यावसायिक/इतर)
७. घराची सद्यस्थिती (चांगली/जीर्ण)
८. कुटुंब क्रमांक
९. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या
१०. कुटुंब प्रमुखाचे नाव
११. कुटुंब प्रमुखाचे लिंग
१२. जातीचा प्रवर्ग (SC/ST/इतर)
१३. घराच्या मालकीची स्थिती (स्वतःचे/भाड्याचे)
१४. राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या खोल्यांची संख्या
१५. कुटुंबात राहणारी विवाहित जोडपी
१६. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत
१७. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता (घरात/बाहेर)
१८. प्रकाशाचा मुख्य स्रोत (वीज/इतर)
१९. शौचालयाची सुलभता
२०. शौचालयाचा प्रकार
२१. सांडपाण्याची निचरा व्यवस्था
२२. स्नानगृहाची उपलब्धता
२३. स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन
२४. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मुख्य इंधन
२५. रेडिओ/ट्रान्झिस्टरची उपलब्धता
२६. टेलिव्हिजन (टीव्ही)
२७. इंटरनेट सुविधा
२८. लॅपटॉप/कॉम्प्युटर
२९. टेलिफोन/मोबाईल/स्मार्टफोन
३०. सायकल/स्कूटर/मोटारसायकल
३१. कार/जीप/व्हॅन
३२. कुटुंबात उपभोगले जाणारे मुख्य धान्य
३३. मोबाईल नंबर (केवळ जनगणना माहितीसाठी)


