२७ जानेवारीला कोकण रेल्वे मुख्यालयात तातडीची विशेष बैठक
Follow us onनवी मुंबई (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोकण रेल्वेचे उप-मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (कमर्शियल मॅनेजर) श्री. दिनेश जी. बोंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत विशेषतः सावंतवाडी टर्मिनस, कोल्हापूर–सावंतवाडी रेल्वे मार्ग, तसेच संध्याकाळची सावंतवाडीपर्यंत धावणारी अतिरिक्त विशेष रेल्वे या महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.
चर्चेदरम्यान उपस्थित सर्व मुद्दे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले असून, या विषयांवर कोकण रेल्वेच्या वाणिज्य (कमर्शियल) विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर वाणिज्यिक चर्चा करून कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. अभिजीत धुरत, कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. दिनेश बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने श्री. नेमळेकर यांचे उपोषण स्थगित करण्यात आले.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे महासंघाच्या मागण्या योग्य व विचारार्ह असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, येत्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


