नवी दिल्ली :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्र राज्याचा आकर्षक आणि आशयघन चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार असून, राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि वाढते आर्थिक सामर्थ्य यांचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवण्यात येणार आहे.
या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ जागतिक स्तरावर राज्याची ओळख अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
चित्ररथाच्या मध्यवर्ती संकल्पनेत गणेशोत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, सजावट व्यावसायिक, प्रकाश व ध्वनी तंत्रज्ञ, वाहतूक, फुलव्यवसाय, पर्यावरणपूरक साहित्य निर्माते अशा असंख्य घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार या संपूर्ण आर्थिक साखळीचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.
चित्ररथावर गणपती बाप्पांची भव्य मूर्ती, पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करणारे कलाकार, लेझीम, फुगडी यांसारखे लोकनृत्यप्रकार, तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे पोशाख आणि रंगसंगती पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून ‘लोकसहभागातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना ठळकपणे मांडण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता, पर्यावरणपूरक उपक्रम, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. शाडू मातीच्या मूर्ती, कृत्रिम विसर्जन तलाव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचाही चित्ररथात समावेश करण्यात आला आहे.
एकूणच, महाराष्ट्राचा हा चित्ररथ परंपरा आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधणारा असून, भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात महाराष्ट्राचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे देशासह जगाला दाखवून देणारा ठरणार आहे.


