कणकवली: निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पडतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच पैशांच्या वाटपावरून आता मतदारांनी चक्क बॅनरबाजी करत राजकीय नेत्यांना चिमटा काढला आहे. कणकवली तालुक्यातील हळवल येथे लावण्यात आलेला एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे बॅनरवर?
हळवल ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराजवळच ग्रामस्थांनी एक मोठा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिले आहे:
”समान मत, समान किंमत..! शहरातील मतदारांना १५ हजार रू. देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये!”
— ग्रामीण भागातील मतदार
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना १०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत वाटप झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. याच चर्चेचा धागा पकडून ग्रामीण भागातील मतदारांनी हा उपरोधिक बॅनर लावला आहे.
”पैशाची हाव की लोकशाहीवर घाव?” असा यक्षप्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. जर शहरात मताची किंमत एवढी मोठी असेल, तर ग्रामीण भागात भेदभाव का? असा तिरकस सवाल करत मतदारांनी राजकीय व्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर उपरोधिक टीका केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


