मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या चालक आणि इतर कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय न करता त्यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान, विश्रांतीगृहामध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि काही कर्मचाऱ्यांकडून येणारी दुर्गंधी पाहून मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “अशा प्रकारचे कृत्य केवळ शिस्तभंग नसून प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा धोकादायक प्रकार आहे,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले.
मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश pic.twitter.com/7kDG77WNuv— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) January 25, 2026
यापुढे एसटी महामंडळाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची, विशेषतः चालकांची, कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ॲनालायझरद्वारे (Breath Analyzer) चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या चाचणीत दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले जाईल. तसेच, अशा गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. परळ बसस्थानकातील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून, प्राप्त अहवालाच्या आधारे दोषींवर बडतर्फीपर्यंतची कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.


