Follow us on
बांदा (सिंधुदुर्ग):
एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करायची जिद्द आणि दुसरीकडे शरीराला ग्रासलेला जीवघेणा आजार, अशा द्वंद्वात अखेर मृत्यूचा विजय झाला. दहावीत ९९ टक्के गुण मिळवून आणि NEET परीक्षेत कोकणात अव्वल येऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे शुक्रवारी कर्करोगाने निधन झाले. तिच्या निधनाने संपूर्ण बांदा शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
कर्करोगावर मात करत मिळवले होते दैदिप्यमान यश
सिद्धी भिडे हिचा प्रवास कोणत्याही चित्रपटाला शोभेल असा प्रेरणादायी पण तितकाच क्लेशदायक होता. सातवीत असतानाच तिला कर्करोगाचे (Cancer) निदान झाले होते. मात्र, या संकटाने खचून न जाता तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९ टक्के गुण मिळवून सर्वांना थक्क केले होते. त्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NEET परीक्षेतही तिने कोकण विभागातून प्रथम येत आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले होते.
डॉक्टर होऊन सेवा करण्याचे स्वप्न अपूर्ण
सिद्धीला स्वतः कॅन्सरचा त्रास होत असतानाही, भविष्यात डॉक्टर होऊन इतरांचे प्राण वाचवायचे होते. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून ती नक्कीच एक उत्तम डॉक्टर झाली असती, अशी भावना तिचे शिक्षक आणि नातेवाईक व्यक्त करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावली आणि वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिची प्राणज्योत मालवली.


