सिंधुदुर्ग: देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या आणि दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाच्या कामगिरीची दखल आता थेट केंद्र सरकारने घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्याने ‘निवती रॉक’ या निर्मनुष्य बेटावर केलेल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा समावेश केंद्र सरकारच्या विशेष ‘कॉफी टेबल बुक’ मध्ये करण्यात आला आहे.
अडथळ्यांची शर्यत आणि जिद्द
निवती किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या बेटावर पोहोचणे अत्यंत कठीण असते. ज्या दिवशी हे ध्वजारोहण करण्यात आले, त्या दिवशी समुद्रात मोठी ओहोटी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत बोटीने प्रवास करून, उभ्या कपारीच्या खडकावर चढून पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकवला. पंतप्रधान मोदी यांनी निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण करण्याबाबत मांडलेल्या संकल्पनेला अनुसरून ही मोहीम राबवण्यात आली होती.
“हा केवळ निवती पोलिसांचा सन्मान नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारने आमच्या कष्टाची दखल घेतली, याचा खूप आनंद आहे.”
— भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निवती पोलीस ठाणे.
या यशामुळे निवती पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


