मुंबई:- भूखंड क्रमांक १५६, प्रेरणा संस्था (रजि.) चारकोप सेक्टर एकच्या वतीने आयोजित केलेल्या ३६ व्या सत्यनारायण महापूजे निमित्त हळदी कुंकू, महाप्रसाद, कला, क्रीडा सांस्कृतिक व श्री प्रवीण सावंत, झाली कृपा साईंची समूहाचे सुस्वर सुगम भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम संस्थेतील बाळ-गोपाळ, महिला मंडळ व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरे केले. उत्सवा दरम्यान प्रेरणा संस्था विद्युत रोषणाईने झगमगली होती.

वरील संस्थेत सादर करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे चारकोप परिसरात विशेष कौतुक होत आहे. सध्याच्या अशाश्वत सांस्कृतिक बदल आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू पाहणाऱ्या मंडळाच्या गर्दीत ‘युवा प्रेरणा मंडळ’ आणि ‘प्रेरणा संस्था पूजा समिती’ यांचे अभिजात मराठी संस्कृतीचा साधेपणा जपणारे आयोजन पाहून मन भारावून गेले. सध्या सर्रास दिसून येणाऱ्या अशाश्वत कार्यक्रमांपेक्षा प्रतीवर्षी अशाच अभिजात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यास आग्रही असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय साईल व पूजा समिती प्रमुख श्री नितीन शिगवण व युवा मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी प्रतिपादन केले. प्रेरणा संस्थेतील रहिवाशांनीही या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दर्शवून संस्कृतीच्या संवर्धनाच्या या महत्कार्यात आपले मोलाचे योगदान दिले.
संस्थेतील श्री प्रशांत संभाजी जाधव हे सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व कुमारी अद्विका अभिजित पालांडे हिने इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धांमधून अनेक सुवर्ण पदके प्राप्त केल्याबद्दल तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेले बाळ गोपाळ, महिला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नवनिर्वाचित नगरसेविका दक्षता कवठणकर, मा. नगरसेवक व सल्लागार सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ श्री श्रीकांत कवठणकर, सर्वश्री योगेश पडवळ सचिव उत्तर मुंबई भाजपा, निखिल गुढेकर शिवसेना शाखाप्रमुख, प्रमोद गुजर मा. वॉर्ड अध्यक्ष भाजपा, मनीष साळुंखे वॉर्ड अध्यक्ष भाजपा, श्री शशांक चौकीदार अध्यक्ष प्रबोधनकार ठाकरे नगर युनियन चारकोप, सौ मनाली चौकीदार महिला विभाग प्रमुख शिवसेना, सौ. विशाखा मोरये महिला विभाग प्रमुख शिवसेना, सर्वश्री राजेंद्र (राजू मामा) खंकाळ समाजसेवक, भूषण विचारे आपला माणूस, उदय कोंडविलकर शाखा अध्यक्ष मनसे, श्री संतोष गवळी शाखा प्रमुख शिवसेना व इतर अनेक मान्यवरांनी श्रीचे दर्शन घेतले आणि आयोजकांस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री संदीप गोसावी, श्री स्वप्नील शिंदे, सौ प्रणाली राऊळ व सौ. स्नेहल निनाद पवार यांनी केले.


