Follow us on
सिंधुदुर्ग: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे दावे केले जात असतानाच, सावंतवाडी तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एका महिला पुरवठा निरीक्षकाने चक्क चुलीवर भाजलेले काजू, साजूक तूप, गोड पपई आणि बकरीच्या दुधाची मागणी केल्याची तक्रार एका गरीब महिलेने केली आहे. या विचित्र मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या शालू जानू कोकरे या महिलेने ही तक्रार केली आहे. शालू कोकरे या धनगर समाजातील असून बकरी पालन आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात गेल्या होत्या.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तेथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दिपाली सचितानंद गोटे/वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी त्यांच्याकडे १०,००० रुपयांची मागणी केली.
लाचेत मागितले ‘खाद्यपदार्थ’
जेव्हा शालू कोकरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले आणि आपण पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट केले, तेव्हा संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांऐवजी पदार्थांची यादीच समोर ठेवली. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, अधिकाऱ्याने खालील वस्तूंची मागणी केली:
पेजेचे तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप, मोठ्या आकाराची गोड पपई, बकरीचे दूध
इतकेच नाही तर, हे सामान कार्यालयात न आणता बाजूच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास आणि दूध फ्रिजमध्ये ठेवण्यास बजावले. ‘हे सामान दिले तर कागदपत्रे नसली तरी एका तासात रेशनकार्ड बनवून देईन’ असे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अपमानास्पद वागणूक
शालू कोकरे यांनी या वस्तू देण्यासही असमर्थता दर्शवली असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने त्यांना “एकही वस्तू देता येत नसेल तर इथून चालती हो, माझा वेळ घालवू नको” अशा शब्दांत अपमानित करून कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कठोर कारवाईची मागणी
याप्रकरणी पीडित महिलेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. एका गरीब आणि गरजू महिलेला अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


