सीबीडी बेलापूर: कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयात २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि रेल्वे अधिकारी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग (ओरस) रेल्वे स्थानकावरील आरक्षण प्रणाली (PRS) केंद्राबाबत रेल्वे प्रशासनाने चिंतेची बाब मांडली आहे. प्रवाशांच्या मागणीखातर सुरू करण्यात आलेल्या या आरक्षण खिडकीला सध्या अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असून, दिवसाला सरासरी केवळ ७ तिकिटांचे आरक्षण होत आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, एखादे आरक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी तिथून दिवसाला किमान २५ तिकिटांची विक्री होणे आवश्यक असते.
प्रवासी महासंघाच्या विनंतीचा मान राखून रेल्वे अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. जर या काळात प्रतिसादात सुधारणा झाली नाही, तर हे केंद्र कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिजित धुरत यांनी ओरस, कुडाळ आणि परिसरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी मोबाईल ॲपऐवजी प्रत्यक्ष रेल्वे खिडकीवर जाऊन आरक्षण करावे. अपेक्षित २५ किंवा त्याहून अधिक आरक्षणे नोंदवून हे केंद्र वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा हे केंद्र बंद झाल्यास महासंघ जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


