मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी आणखी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल उचलले आहे. स्वराज्याची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन अत्याधुनिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या ५५ आसनी (३×२ आसन रचना) असलेल्या आधुनिक बसेसना “राजमाता जिजाऊ” असे नाव देण्यात आले असून या बसांची पहिली झलक समोर आली आहे. या बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत धावणार असून अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा यामुळे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला आकार मिळाला. त्यांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि संस्कारांमुळेच स्वराज्याची पायाभरणी झाली. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू होणारी ही बससेवा केवळ प्रवासाची सुविधा नसून इतिहासाचा आणि स्वराज्याच्या मूल्यांचा सन्मान मानला जात आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला सलाम करत ही “राजमाता जिजाऊ” बससेवा लवकरच राज्याच्या विविध मार्गांवर धावू लागणार आहे.


