Mumbai konkan Ro Ro Service: विजयदुर्ग बंदरात ‘एम-२-एम प्रिन्सेस’ फेरीत ‘विघ्न’!

   Follow us on        

विजयदुर्ग: कोकणातील महत्त्वाच्या मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेत धावणाऱ्या ‘एम-२-एम प्रिन्सेस’ या फेरीबोटला गुरुवारी विजयदुर्ग बंदरात किरकोळ अपघात झाला. बंदरात उभ्या असलेल्या या फेरीबोटला एका टगबोटीची धडक लागल्याने बोटीचे थोडे नुकसान झाले.

ही रो-रो सेवा २ मार्चपासून सुरू झाली असून बुधवारी विजयदुर्ग येथे तिची दुसरी फेरी दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही बोट पुन्हा मुंबईकडे रवाना होणार असतानाच बंदरातील एका टगबोटीने फेरीबोटला धडक दिली. या धडकेत बोटीचे काही प्रमाणात नुकसान झाले.

प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला. गुरुवारी मुंबईला जाण्यासाठी एकूण ३० प्रवाशांनी बुकिंग केले होते.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कंपनीने सर्व प्रवाशांचे तिकीट पैसे तत्काळ परत केले. तसेच बोटीवरील काही कर्मचाऱ्यांना देवगडमार्गे खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईला पाठविण्यात आले. दिवसभर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा तपासणी करून ‘एम-२-एम प्रिन्सेस’ ही फेरीबोट प्रवाशांविना मुंबईकडे रवाना झाली.

या किरकोळ अपघातामुळे नव्याने सुरू झालेल्या या जलवाहतूक सेवेला तात्पुरता खंड पडला असला, तरी प्रवाशांच्या हिताचा विचार करून कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search