कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.
दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.


