Mumbai: मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) कार्यरत असणाऱ्या महिला शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील सकाळची आणि सायंकाळची प्रचंड गर्दी तसेच प्रवासासाठी लागणारा मोठा वेळ विचारात घेऊन, महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी ‘लवकर या, लवकर जा’ (Come Early, Go Early) ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार, ज्या महिला कर्मचारी सकाळी ९:१५ ते ९:४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन आपले काम सुरू करतील, त्यांना तेवढ्याच प्रमाणात (जास्तीत जास्त ३० मिनिटे) सायंकाळी कार्यालय लवकर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. १० मार्च २०२६ रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होणार आहे.
मात्र, ही सवलत देताना शासनाने काही अटी देखील घातल्या आहेत. या लवचिक वेळेमुळे शासकीय कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता महिला कर्मचाऱ्यांनी घेणे अनिवार्य आहे. तसेच, विधानमंडळाचे कामकाज, न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर तातडीच्या कामाच्या वेळी कार्यालयात वेळेनंतर थांबणे बंधनकारक राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशिष्ट सूचना दिल्यास त्या पाळणेही आवश्यक असेल. मुंबईतील रेल्वेमधील गर्दीचे विभाजन व्हावे आणि महिलांचा प्रवासाचा ताण कमी व्हावा, या उदात्त हेतूने राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


