Mumbai Locals: मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्तार रखडला; ३४ पैकी केवळ ५ स्थानकांची कामे पूर्ण

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी हाती घेण्यात आलेले १५ डब्यांच्या लोकलसाठीचे फलाट विस्तारीकरणाचे काम सध्या अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण, कसारा आणि खोपोली या मार्गावरील एकूण ३४ स्थानकांमध्ये हे काम नियोजित आहे. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ ५ स्थानकांवरील काम पूर्ण झाले असून उर्वरित २९ स्थानकांमध्ये प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​आतापर्यंत केवळ विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत आणि तानशेत या स्थानकांमध्येच विस्तारीकरणाचे काम मार्गी लागले आहे. याउलट, सीएसएमटी, विक्रोळी, कळवा, मुंब्रा, दिवा, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण यांसारख्या अत्यंत गर्दीच्या स्थानकांसह शहाड, टिटवाळा, कसारा आणि खोपोली मार्गावरील स्थानकांमध्ये कामे रेंगाळली आहेत. अनेक ठिकाणी कामासाठी फलाटावरील छत काढण्यात आल्याने प्रवाशांना भरउन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे.

​या रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. फलाटांवर ठिकठिकाणी पडलेला राडारोडा आणि अर्धवट बांधकामामुळे चालणेही कठीण झाले आहे. लोकलची क्षमता वाढवून गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा मानस असला, तरी प्रत्यक्ष कामातील या संथगतीने प्रवाशांच्या सोयीपेक्षा गैरसोयीतच भर टाकली आहे. प्रशासनाने ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search