पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच ‘महाराष्ट्रलीकर्स’ (Maharashtra Leakers) नावाच्या टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ५ मार्च रोजी होणारा गणित भाग-२ चा पेपर तब्बल तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.
या प्रकरणाची माहिती मिळताच बोर्डाच्या अधिकार्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या या प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकांशी पडताळणी केली. तपासाअंती या दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने पुणे विभागीय मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार, संबंधित टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस आता या रॅकेटचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या पेपर लीकच्या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, संबंधित विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


