Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असताना तसेच अनेक भागात काम सुमार झाले असताना शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्यावरून ह्या महामार्गावरील वाहतुकीसाठी टोल वसुली सुरू होणार आहे असे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
- मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९० रुपये
- मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १४५ रुपये
- ट्रक आणि बस (२ ॲक्सल) : ३०५ रुपये
- व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी : ३३५ रुपये
- मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी : ४८० रुपये.
- सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : ५८५ रुपये
- अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्क
वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला आहे.
हेही वाचा : जनआक्रोश सभा ! 2023 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण नाही झाले तर…..
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जूनपासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या. यात टोल वसुली करणाऱ्या कंपन्या निश्चित झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून महामार्गावरील वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे.
हेही वाचा : पर्यटनाचा हंगाम…कोंकणरेल्वे मार्गावरील ८ गाड्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार
Vision Abroad