नवी दिल्ली : बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
संबंधित बातमी – कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?
असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे – मिरज – बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या आधीही कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी या लोहमार्गाला मंजुरी मिळाली आहे पण निधीअभावी त्याचे काम अजूनही चालू झाले नाही आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad