सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यात साळशी येथे उभ्या दगडात कोरलेली दोन कातळशिल्पे (पेट्रोग्लिफ्स) आढळली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे अनेक ठिकाणी आढळतात. मात्र, उभ्या दगडात कोरलेली कातळचित्रे कोकणात प्रथमच सापडली असल्याचा दावा देवगड तालुका इतिहास संशोधन मंडळाने केला आहे.
झाडी तोडून साफ करताच उभ्या दगडावरची कातळशिल्पे सापडली.
तालुक्यातील साळशी येथील नैसर्गिक ओहोळालगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकताच सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात आला. तेव्हा या भागातील वाढलेली झाडी तोडून साफसफाई करण्यात आली. बंधाऱ्यालगतच सुमारे दहा-पंधरा फूट उंचीचा मोठा दगड आहे. या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली असल्याचे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या योगेश धुपकर यांना याबाबत माहिती दिली. कोणता तरी शिलालेख सापडल्याचे कळताच तातडीने मंडळातर्फे साळशी मोहीम आखण्यात आली. या वेळी अभ्यासकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली. या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजूस दगड तासून सपाट केला असून, त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.
गेल्या काही वर्षांत रत्नागिरीपासून कुडाळ, वेंगुर्लेपर्यंत दीड हजाराहून अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नांतून उजेडात आली. ही सर्वच कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ट्य आहे; मात्र, साळशी येथे उभ्या दगडात कोरलेले कातळचित्र आढळले आहे. या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या मोहिमेत पुरातत्त्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांच्याबरोबर योगेश धुपकर व अजित टाककर सहभागी झाले.
हेही वाचा > मुंबई-गोवा महामार्गावर वन्यप्राण्यांचे अपघातांपासून संरक्षण करण्यासाठी NHAI कडून विशेष प्रयत्न
Facebook Comments Box
Vision Abroad