रत्नागिरी –आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना बारसू येथील प्रस्तावित जागा रिफायनरी प्रकल्पासाठी कशी अनुकूल आहे ते पटवल्यानंतरच मी ते पत्र केंद्राला लिहिले अशा शब्दात त्या पत्राबद्दल खुलासा आज उद्धव ठाकरे यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेताना केला. तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या प्रकल्पावरून सरकारने माघार घेतली नाही तरी लवकरच हे सरकार कोसळणार आहे. यांच्या खुर्चीचे पाय डळमळीत होत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. बारसू येथील रिफायनरी विरोधात ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी ते आज बारसू – सोलगाव दौऱ्यावर होते.
आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना मला सांगितलं की, बारसू येथे हा प्रकल्प झाला तर त्याला विरोध होणार नाही. बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. तसंच पर्यावरणाचीही फारशी हानी होणार नाही. त्यानंतर मी या जागेबाबत केंद्राला पत्र लिहिलं. मात्र या प्रकल्पाबाबत माझा असा विचार होता की, मुख्यमंत्री असतानाच बारसूत येऊन या प्रकल्पाचं येथील स्थानिक जनतेला प्रेझेन्टेशन द्यायचं. आता दुर्दैवाने फक्त मी लिहिलेल्या पत्राचं भांडवल केलं जातं, मात्र जी पारदर्शकता हवी ती ठेवली जात नाही.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जे वेदांता फॉक्सकॉन आणि इतर जे चांगले प्रकल्प आणले होते, ते केंद्राने यांच्या नाकाखालून गुजरातला नेले, तेव्हा हे गप्प का बसले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच त्यांनी या दौऱ्यात पोलीस अधीक्षकांना बारसूत झालेल्या आंदोलनात केलेल्या लाठीमाराबद्दल चांगले झापले आहे.
Vision Abroad