Mumbai-Goa Vande Bharat : सर्व कोकणवासीयांना उत्सुकता लागून राहिलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस च्या उद्घाटनाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवारी दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले जाणार आहे.
“आमच्याकडे या आधीच आठ डब्यांचा नवा कोरा रेक चेन्नई वरून आला आहे. उद्घाटनाची सर्व तयारी झाली असून शनिवार दिनांक ३ जून रोजी मडगाव स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करतील. या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत गाडी सर्वात जलद गाडी ठरणार आहे. हे अंतर कापण्यास तिला फक्त ७ तास लागणार आहेत. या गाडीचे वेळापत्रक आणि थांबे लवकरच जाहीर होणार असून दिनांक ५ जूनपासून ही गाडी या मार्गावर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे.” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
या आधी २९ मे रोजी वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याची माहिती समोर आली होती. दिनांक २८ मे रोजी नवा कोरा रेक मडगाव स्थानकावर दाखल झालाही होता, मात्र काही कारणाने ही तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र आता पुढे आलेली नवीन तारीख रेल्वेतर्फे पाळली जाईल अशी आशा आहे.
Facebook Comments Box