आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.