रत्नागिरी : ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन एका व्हिडिओद्वारे करणाऱ्या या आगारातील चालक अमित आपटे यांच्यावर एसटी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केल्याने रत्नागिरी एसटी प्रशासन चर्चेत आले आहे.
गाडय़ांची योग्य देखभाल न केल्याने आगारप्रमुख आमच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत, असा थेट आरोप करून आपटे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, या दोन्ही गाडय़ा सतत ब्रेक डाऊन होत असतात. गेल्या २५ दिवसांत त्याबाबत आम्ही चालकांनी अनेकदा तक्रार नोंदवली आहे. पण त्यांची दखल न घेता आमच्यावरच कारवाई केली जाते.आपण हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कारवाई होऊन घरी बसवले जाईल, याची जाणीव आहे. पण अपघात होऊन घरी बसण्यापेक्षा असे घरी बसलेले बरे, अशी टिप्पणी आपटे यांनी केली आहे. प्रवाशांनी या परिस्थितीची गंभीरपणे नोंद घेऊन या बसगाडय़ांनी प्रवास टाळावा, तसेच राज्यकर्त्यांनी या समस्येची गंभीरपणे दखल घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक नागरिकांनीही एसटीच्या कारभाराचे छायाचित्रांसह वाभाडे काढले. देवरुखमधील सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली.
एसटी प्रशासनाचे या सर्वावर उत्तर
दरम्यान बस चालकाने व्हिडीओत दावा केलेल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिले आहेत. शिवाय एस टी महामंडळाची बदनामी करीत प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या चालकाचे निलंबन देखील करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक बोरसे यांनी दिली आहे. या चालकाने कोरोना काळात देखील असे खोडसाळ व्हिडीओ केले होते असेही ते म्हणाले.
"…'या' एसटी बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा" असे आवाहन करणाऱ्या 'त्या' बस चालकाचे निलंबन – Kokanai https://t.co/qyAqHBqZMH#kokanaiLiveNews#msrtc#Ratnagiri pic.twitter.com/vrkhFshHy0
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) August 26, 2023
Facebook Comments Box
Vision Abroad