Kokan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.
ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.
Vision Abroad