पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
Facebook Comments Box