मुंबई: मध्य उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उपनगरीय लोकलच्या नव्या वेळापत्रकाची आखणी केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या १० लोकल दादर स्थानकातून सुटणार असून परळ स्थानकातून अतिरिक्त २४ लोकल फेऱ्या सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
दादर रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महिन्यांपूर्वीच प्लॅटफॉर्म क्रमांक आठ रुंद करण्यात आला. फलाट क्रमांक दहाचे दुतर्फीकरण झाल्याने जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने चढ-उतार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला, तसेच फलाट क्रमांक नऊ आणि दहादरम्यान असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले; मात्र तरीही दादर स्थानकांतून लोकल पकडताना प्रवाशांची गैरसोय होत होती. त्याबाबत अनेक तक्रारी मध्य रेल्वेकडे केल्या होत्या. याची दाखल घेऊन मध्य रेल्वेने दादर आणि परळ स्थानकातून आणखी लोकल सोडण्याचे नियोजन केले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मध्य रेल्वेला सध्या नव्याने लोकल चालवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नव्या वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकलचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप आणि डाऊनच्या प्रत्येकी पाच अशा एकूण १० फेऱ्या दादर स्थानकातून, तर २४ धीम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत. सध्या परळ स्थानकातून २२ फेऱ्या सूटत असल्याने परळहून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या ४६ पर्यंत पोहोचणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad