Follow us on Mumbai Goa Highway:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.
“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.