



सिंधुदुर्ग: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना (उबाठा) आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसे पोहोचू शकतात? असा प्रश्न विचारून मालवणला जे घडले ते जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी घडवून आणण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
काल रात्री उशिरा त्यांनी एक्स X वर पोस्ट करून हे आरोप केले आहेत.
”आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो???
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.” असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
आधीच येथील वातावरण तापलेले असताना निलेश राणे यांच्या या पोस्टमुळे नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.