Mumbai Goa Highway: ३ सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणीदरम्यान जाहीर केले होते. प्रत्यक्षात या दुसऱ्या बोगद्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर बनली आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ५ सप्टेंबरला काहीही करून बोगद्यातील वाहतूक सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
पाहणीदरम्यान ३ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केल्यानंतर शिंदे यांनीही दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल अन् कोकणात जाणारे चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दुसऱ्या बोगद्याचे काम संथगतीने सुरू आहे. दुसऱ्या बोगद्याच्या भोगावकडील बाजूला अजून भराव करण्याचे काम सुरू आहे. बाजूपट्ट्या असलेल्या पुलाजवळील रस्ताही अद्याप जोडण्यात आलेला नाही. दुसऱ्या बोगद्याच्या कामादरम्यानची गटारे अपूर्णावस्थेत आहेत. पोलादपूरकडून खेडकडे येणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. अंतर्गत कामेही अपूर्ण आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक कितपत सुरू होईल याबाबत सांशकता आहे.
Vision Abroad