Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरून येणार्या-जाणार्या वाहनांची नोंद झाली असून मागील ९ दिवसांत सुमारे ७ लाख या मार्गावरून गेल्या आहेत.
महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या व येणार्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेतली गेली होती. या नोंदी नुसार आज पर्यंत नऊ दिवसात अंदाजे सात लाख गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. बाप्पाच्या विसर्जनानंतर रविवार दुपारी ३ वाजल्या पासून पुन्हा मुंबई, गुजरातच्या दिशेने येणार्या या वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने परतीचा प्रवास करत आहेत.
दिवस रात्रभर सुरू असणारा सदरचा प्रवास पहाटे पर्यंत सुरूच होता. परतीच्या प्रवासासाठी सुद्धा मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव- कोलाड बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे.
महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील १६३ पोलीस अधिकारी आणि १ हजार ७०० पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. तर अवजड वाहनांची बंदी आदेश मोडणार्या अंदाजे ५० हुन अधिक अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई केली आहे.
Vision Abroad