



पालघर: राज्यात मोठ्याप्रमाणावर नेमबाज तयार करण्याच्या ध्येय्याने प्रेरीत झालेल्या अनेक मातब्बर नेमबाजांसह प्रेसीहोल कंपनीने ऑलंपिक धर्तीवर आयोजीत राज्य स्तरीय बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धा पालघर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मोनल कारदानी यांनी प्रथम तर राल्सन सिइल्हो द्वितीय तर विनय पाणीग्रही यांनी तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. तर रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले रायफल शुटींग स्पोर्टस अकॅडमीच्या किमया जाधवला यंगेस्ट शुटर ॲवॉर्ड देवून गौरविण्यात आले.
पालघर येथील समीर पाटील रायफल शुटींग अकॅडमीच्या भव्य आधुनिक मैदानात आयोजित या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे मैदानाला मिनी ऑलंपिकचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.
जगभरात तब्बल ६७ पेक्षा अधिक देशांमध्ये बेंचरेस्ट रायफल शुटींग खेळले जाते. तसेच आगामी काही वर्षात ऑलंपिकमध्ये या खेळाची वर्णी लागण्याची शक्यता जेष्ठ नेमबाज व टायरो कंपनीचे राजीव ठाकूर यांनी व्यक्त केली .यावेळी प्रेसीहोल कंपनीचे मालक डॉ .श्री. वाय पी. तथा योगेंद्र शिरसाट व अंजूम काझी यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना नियम पाळा ,खेळा आणि जिंका असा सल्ला दिला. दरम्यान बॉलीवुडचे जेष्ठ विनोदवीर टिकू तलसानिया यांनी देखील स्पर्धक म्हणून हजेरी लावल्याने उपस्थितांना आणखी प्रेरणा मिळाली. राज्यसरकारने याकडे लक्ष पुरविल्यास महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल अस उद्गार त्यांनी यावेळी काढले. सदर स्पर्धेत वयाने सर्वात कमी असलेल्या यंगेस्ट शुटर ठरलेल्या किमयाचे प्रेसीहोल्सच्या अंजूम काझी व जेष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले , एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व स्काऊट मास्टर ॲड . प्रशांत जाधव , ठाणेचे प्रथितयश नेमबाज मनिष कर्णिक , एसपीएसएसए पालघर चे सर्वेसर्वा समीर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.