सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.
आता नाही तर कधीच नाही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा
सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.
Vision Abroad