GST Notice to Panipuri Vendor:तमिळनाडूतील पाणीपुरी दुकानदाराने ऑनलाइन पेमेंटद्वारे एका वर्षात 40 लाख रुपये कमावल्याचं समोर आलं आहे. यानंतर या दुकानदाराला जीएसटीची नोटीस मिळाली आहे. हीच नोटीस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही नोटीस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जीएसटी नियमानुसार, 40 लाख एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांने नोंदणी करणे आणि कर आकारणी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नोटीसचा फोटो अनेकांनी शेअर करत आपल्या पोस्ट केल्या आहेत. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. ही नोटीस ‘तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा’ आणि ‘केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम 70’ अंतर्गत जारी करण्यात आली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या तीन वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात मिळालेल्या मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही माहिती डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून गोळा करण्यात आली आहे. 40 लाख वार्षिक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न करता वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा मानला जातो, असेही या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Vision Abroad