मुंबई:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केलेल्या आदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्या विरोधानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर ही स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.
गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती
गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे
Vision Abroad