Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत.शनिवारी अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबत माहिती दिली.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3 A अंतर्गत, मुंबईत लवकरच २३८ एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. खरेदी रखडल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. आता १८ महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर भर देण्यात येत आहे.
एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या मूळ योजनेनुसार, फेज 3 मध्ये ४७ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ३,४९१ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर फेज 3 A मध्ये १९१ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे १५,८०२ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करता येईल. शिवाय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तरी या २३८ एसी ट्रेन मुंबईत कधी धावणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Vision Abroad