



डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात संपुष्टात आणण्यासाठी कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांतर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे.
सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास केडीएमसीचा पैसा वाया जाऊ शकतो. कल्याणकरांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.