Vaibhavwadi Railway Station: कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.
Facebook Comments Box