मुंबई: यावर्षी कोकणात जाण्यासाठी वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांना मोठी खुशखबर दिली असून माझगाव ते मालवण जलवाहतुकीने अवघ्या पाच तासांत पोहोचता येणार आहे. येत्या गणेशचतुर्थी पर्यंत ही वाहतूक खुली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
या वॉटर मेट्रोमुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा पडणारा मोठा ताण हा विभागला जाणार असून जलवाहतुकीचा मोठा पर्याय आगामी काळात मुंबईकरांना खुला होऊ शकणार आहे, असेही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेल्वेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सागरी मंडळाने रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतुकीची जलद सेवा चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थीला उपलब्ध करून दिली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली. मालवणला जाऊ इच्छिणारे थेट दुचाकी, चारचाकी गाडी घेऊन माझगाव ते मालवण हा जलप्रवास जलद गतीने करता येणे शक्य आहे. याकरता मालवण आणि विजयदुर्ग असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यांना मालवणी येथे पोहोचायचे असेल त्यांनी मालवणला, तर ज्यांना विजयदुर्ग येथून कोकणातील आपल्या गावी जायचे असेल त्यांच्याकरता विजयदुर्ग येथे दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.
सरकार जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात आपल्याला अधिकाधिक काम करण्यास सांगितले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर ट्रान्सपोर्टला म्हणजेच जलवाहतुकीला शासकीय पातळीवर गती देण्याचे काम प्रगतिपथावर असून याबाबतचे डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी नसला तरी आगामी वर्षात साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या सुमारास कोचीनच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर मेट्रोला मान्यता देण्यात येईल.
यंदाच्या गणपती उत्सवात सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी माझगाव पासून ते थेट मालवणपर्यंत रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
Facebook Comments Box