



तळकोकणातील एक महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर गाडी क्रमांक १२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेसला थांबा देण्यासाठी कल्याण पूर्व क्षेत्रातील आमदार सुलभा गायकवाड पुढे सरसावल्या आहेत. या गाडीला सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर थांबा मिळवून देणे आणि कोरोना काळात ZBBT च्या नावाने या स्थानकावरील काढून घेतलेले गाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत या मागण्यांसाठी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवले आहे.
मंगलोर एक्सप्रेसच्या कणकवली थांब्यानंतर महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या गाडीच्या नॉन-स्टॉप ऑपरेशनमुळे सावंतवाडीहून आणि सावंतवाडीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गाडीला सावंतवाडी टर्मिनसवर थांबा दिल्यास अनेक प्रवाशांना फायदा होईल, ज्यामुळे प्रवास सुलभ होईल आणि रेल्वे सेवेची सुलभता वाढेल. तसेच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील कोरोना काळात ZBBT च्या नावाखाली काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्यात यावेत, तसे केल्याने या प्रदेशातील प्रवाशांना अधिक सुरळीत प्रवास करता येईल. मी विनंती करते की संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयी आणि कल्याणाचा विचार करून लवकरात लवकर हा थांबा जोडण्याचा आणि कोरोना काळात काढून घेतलेले तांबे पूर्ववत करण्याचा विचार करावा. असे त्यांनी या निवेदनात लिहिले आहे.