



भारताची संस्कृती ही निसर्गपूजेवर आधारित आहे आणि विविध जीवसृष्टीशी सहअस्तित्वाचा संदेश देणारे सण आपण साजरे करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, विशेषतः कोकणातील नागपंचमी ही पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे.
नागपंचमीचा पारंपरिक संदर्भ
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यामागे प्राचीन आख्यायिका, धार्मिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. पुराणानुसार, या दिवशी शेषनागाची पूजा केल्यास भय, रोग, संकट टळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. कोकणात नागदेवतेबद्दल विशेष श्रद्धा असून घराघरांतून या दिवशी सर्पपूजा केली जाते.
कोकणातील सण साजरा करण्याची वैशिष्ट्ये
कोकणातील नागपंचमीची पूजा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते:
नागपंचमीला घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी घरोघरी स्त्रिया नदीकाठची किंवा विशिष्ट मऊ माती घेऊन नागदेवतेच्या मूर्ती स्वतः तयार करत असत. आता या मूर्ती बाजारात उपलब्ध होत आहेत. या मूर्ती घराच्या पूजास्थानी ठेवून त्यांची विधिपूर्वक पूजा होते. नागदेवतेला दूध, फळे, लाह्या, नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. साखर घालून केलेले दूध सर्पांना अर्पण करणे ही श्रद्धेची खूण मानली जाते. काही घरांमध्ये हळद-कुंकवाने किंवा शाडूने भिंतीवर किंवा उंबरठ्यावर नागाचे चित्र रंगवले जाते. हे चित्र संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते.
कोकणात जंगल आणि शेतीशी नाते असल्याने सर्पांशी अनेक वेळा थेट सामना होतो. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण सहअस्तित्व राखण्याचा संदेश या सणातून मिळतो.
सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व
नागपंचमीचा सण हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय जागृतीचा संदेशही देतो. सापांचा परिसंस्थेतील महत्त्वाचा सहभाग असून त्यांचं अस्तित्व शेती आणि निसर्गासाठी आवश्यक आहे. सर्पांना न मारता त्यांना वाचवण्याचा संदेश नागपंचमी देतो.
कोकणातील नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारा, सजीव सृष्टीविषयी आदर निर्माण करणारा आणि पारंपरिक श्रद्धा जपणारा एक संस्कृतिक पर्व आहे. मातीतून मूर्ती बनवणं, नैवेद्य अर्पण करणं, सहअस्तित्वाचा विचार – हे सर्व कोकणातील जीवनपद्धतीचं प्रतिबिंब आहे.