



मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.
मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.
याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.
विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.