कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search