सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भिजत घोंगडे; मुंबईतील सिंधुपुत्र आमदारांचा कोकणवासियांच्या हक्कासाठी लढा.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रलंबित मागण्यांकडे वेधले लक्ष.

   Follow us on        

मुंबई: कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आणि कोकण रेल्वेच्या विविध गाड्यांना थांबा मिळावा, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार श्री. अनंत (बाळा) नर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळचे सिंधुदुर्गातील तरळा-वारगावचे सुपुत्र असलेल्या श्री. नर यांनी थेट मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कोकणवासियांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे या प्रश्नासाठी लढणाऱ्या स्थानिक प्रवासी संघटनांच्या संघर्षाला मोठे बळ मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस आणि कोचिंग डेपोचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. हक्काच्या गाड्या सोडण्याकरिता आणि इतर टर्मिनस सुविधांसाठी त्यांना थेट मडगाव किंवा मुंबईवर अवलंबून राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार बाळा नर यांनी आपल्या पत्राद्वारे या गंभीर समस्येकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यास केवळ प्रवाशांची सोय होणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील.

या पत्राद्वारे केवळ टर्मिनसच्या कामाचीच नव्हे, तर कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा मंजूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यामध्ये मुंबई-मंगळूरु एक्सप्रेस, संपर्कक्रांती एक्सप्रेस, निजामुद्दीन – एर्नाकुलम एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. या थांब्यांमुळे मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणी चाकरमान्यांची प्रवासाची सोय होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

स्थानिक संघटनांचा अविरत संघर्ष

सावंतवाडी टर्मिनस आणि रेल्वे थांब्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) सातत्याने लढा देत आहे. संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी श्री. संदीप गुरव, शाखाप्रमुख श्री. नंदकुमार ताम्हणकर, उपशाखाप्रमुख शैलेश बांदेलकर, श्री. केशव पांचाळ, राजापूर तालुका सहसंपर्कप्रमुख श्री. जगन्नाथ कदम आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. काही दिवसांपूर्वीच माहीमचे आमदार श्री. महेश सावंत यांनीही या विषयात पत्रव्यवहार केला होता. आता आमदार बाळा नर यांच्या पुढाकाराने या मागणीला अधिक वजन प्राप्त झाले आहे.

आमदार नर यांच्या या पत्रामुळे कोकणवासियांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, “आता कोकणच्या हक्काचे टर्मिनस मिळवूच!” असा निर्धार व्यक्त केला जात आहे. सरकार आणि रेल्वे प्रशासन या मागणीची दखल घेऊन कोकणवासीयांना न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search