मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पुढील पाच वर्षांत एकूण ७४९ नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत, २०३० पर्यंत रेल्वेची प्रवासी वहन क्षमता दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
नव्या फेऱ्यांचे असे आहे गणित:
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दोन्ही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे:
मध्य रेल्वे: सध्या १८१० फेऱ्या असून, ५८४ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे.
पश्चिम रेल्वे: सध्या १४०६ फेऱ्या असून, १६५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे.
याशिवाय, मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे. मध्य रेल्वेवर सध्या ८२ मेल-एक्स्प्रेस असून त्यात ६८ वाढीव गाड्या, तर पश्चिम रेल्वेवर सध्या ४४ गाड्या असून ६५ वाढीव गाड्यांचे नियोजन आहे.
पायाभूत सुविधांवर भर
हे नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत.
मेगा टर्मिनस: पनवेल-कळंबोली, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि परळ येथे नवीन मेगा टर्मिनस उभारले जात आहेत.
प्लॅटफॉर्म विस्तार: विद्यमान स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे आणि नवीन रेल्वे मार्गिका (Lines) उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.
नव्या मार्गिका: एकूण २२ नवीन प्लॅटफॉर्म आणि ३६ नवीन मार्गिकांमुळे गाड्यांचे संचलन अधिक सुलभ होईल.


