गुहागर: नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात बुडू लागले. स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असले, तरी कुटुंबप्रमुखाचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
मुंबईतील पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या (४२) हे आपल्या कुटुंबासह नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर येथे आले होते. शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास अमोल, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे तिघेही किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.
जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न
तिघेजण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या.. जीवरक्षकांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अमोल यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. अमोल मुथ्या यांनाही बाहेर काढून त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) सारखे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पर्यटकांना खबरदारीचे आवाहन
सध्या वर्षाखेरच्या सुट्ट्यांमुळे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. समुद्राचा अंदाज न येणे किंवा खोल पाण्यात जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राची भरती-ओहोटी पाहूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


