Author Archives: Kokanai Digital

Railway Updates: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय; ‘या’ ४८ शहरांमधील रेल्वे क्षमता दुप्पट होणार

   Follow us on        

नवी दिल्ली: वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने आगामी ५ वर्षांत देशातील प्रमुख शहरांमधील रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली असून, सन २०३० पर्यंत ही क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​या योजनेचा मुख्य भर गर्दी कमी करणे, नवीन गाड्या सुरू करणे आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारणे यावर असेल.

​पुणे आणि मुंबईसह ४८ शहरांची निवड

​रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी देशातील ४८ प्रमुख शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ मुख्य टर्मिनल्सवर भार न टाकता आजूबाजूच्या उपनगरीय स्थानकांचाही विकास केला जाणार आहे.

​पुणे शहराचे उदाहरण: पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी हडपसर, खडकी आणि आळंदी या स्थानकांचा विकास करून तिथे प्लॅटफॉर्म आणि स्टॅब्लिंग लाईन्सची संख्या वाढवली जाईल.

​क्षमतेत वाढ करण्यासाठी ‘हे’ असतील ४ मुख्य टप्पे:

​१. टर्मिनल विस्तार: विद्यमान टर्मिनल्सवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टॅब्लिंग लाईन्स आणि पिट लाईन्सची निर्मिती करणे.

२. नवीन टर्मिनल्स: शहरी भागाच्या परिसरात नवीन रेल्वे टर्मिनल्स शोधणे आणि विकसित करणे.

३. देखभाल सुविधा: गाड्यांच्या देखभालीसाठी ‘मेगा कोचिंग कॉम्प्लेक्स’ उभारणे.

४. तांत्रिक सुधारणा: सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण, मल्टी-ट्रॅकिंग आणि रेल्वे यार्डांमधील अडथळे दूर करणे.

​तात्काळ आणि दीर्घकालीन नियोजन

​हा प्रकल्प जरी २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असले, तरी प्रवाशांना याचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी कामांची विभागणी ‘तात्काळ’, ‘अल्पकालीन’ आणि ‘दीर्घकालीन’ अशा तीन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. उपनगरीय (Suburban) आणि लांब पल्ल्याच्या (Non-suburban) अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे.

​”आम्ही प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. या निर्णयामुळे रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होईल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.”

— अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

​यादीतील काही प्रमुख शहरे:

​दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, जयपूर, लखनौ, पटना आणि गुवाहाटी यांसह एकूण ४८ शहरांचा या विशेष योजनेत समावेश आहे.

​या निर्णयामुळे येत्या काळात रेल्वे प्रवाशांना अधिक गाड्या, कमी प्रतीक्षा यादी आणि स्थानकांवर चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरांची यादी 

​१. दिल्ली (Delhi)

२. मुंबई (Mumbai – CR, WR)

३. कोलकाता (Kolkata – ER, SER, Metro)

४. चेन्नई (Chennai)

५. हैदराबाद (Hyderabad)

६. बेंगळुरू (Bangalore)

७. अमदावाद (Amdavad)

८. पटणा (Patna)

९. लखनौ (Lucknow – NR, NER)

१०. पुणे (Pune)

११. नागपूर (Nagpur – CR, SECR)

१२. वाराणसी (Varanasi – NR, NER)

१३. कानपूर (Kanpur)

१४. गोरखपूर (Gorakhpur)

१५. मथुरा (Mathura)

१६. अयोध्या (Ayodhya)

१७. आग्रा (Agra)

१८. पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन (Pt Deen Dayal Upadhyay Jn)

१९. चंदीगड (Chandigarh)

२०. लुधियाना (Ludhiana)

२१. अमृतसर (Amritsar)

२२. इंदूर (Indore)

२३. भोपाळ (Bhopal)

२४. उज्जैन (Ujjain)

२५. जम्मू (Jammu)

२६. जोधपूर (Jodhpur)

२७. जयपूर (Jaipur)

२८. वडोदरा (Vadodara)

२९. सुरत (Surat)

३०. मडगाव (Madgaon)

३१. कोचीन (Cochin)

३२. पुरी (Puri)

३३. भुवनेश्वर (Bhubaneshwar)

३४. विशाखापट्टणम (Vishakhapatnam)

३५. विजयवाडा (Vijaywada)

३६. तिरुपती (Tirupati)

३७. हरिद्वार (Haridwar)

३८. गुवाहाटी (Guwahati)

३९. भागलपूर (Bhagalpur)

४०. मुझफ्फरपूर (Muzaffarpur)

४१. दरभंगा (Darbhanga)

४२. गया (Gaya)

४३. मैसूर (Mysore)

४४. कोइम्बतूर (Coimbatore)

४५. टाटानगर (Tatanagar)

४६. रांची (Ranchi)

४७. रायपूर (Raipur)

४८. बरेली (Bareilly)

हिवाळी पर्यटन जीवावर बेतले; गुहागरच्या समुद्रात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू; आई आणि मुलाला वाचविण्यात यश

   Follow us on        

गुहागर: नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणात पर्यटनासाठी आलेल्या एका मुंबईकर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण समुद्रात बुडू लागले. स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकाचे प्राण वाचले असले, तरी कुटुंबप्रमुखाचा मात्र बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

नेमकी घटना काय?

मुंबईतील पवई परिसरात राहणारे अमोल मुथ्या (४२) हे आपल्या कुटुंबासह नाताळच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुहागर येथे आले होते. शनिवारी (२७ डिसेंबर) दुपारी १२:३० च्या सुमारास अमोल, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे तिघेही किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.

जीवरक्षकांचे शर्थीचे प्रयत्न

तिघेजण समुद्रात बुडत असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले गुहागर नगरपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या.. जीवरक्षकांनी अत्यंत वेगाने हालचाली करत अमोल यांची पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले. अमोल मुथ्या यांनाही बाहेर काढून त्यांना वाचवण्यासाठी ‘सीपीआर’ (CPR) सारखे प्रथमोपचार देण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

पर्यटकांना खबरदारीचे आवाहन

सध्या वर्षाखेरच्या सुट्ट्यांमुळे कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. समुद्राचा अंदाज न येणे किंवा खोल पाण्यात जाणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावरील सूचनांचे पालन करावे आणि समुद्राची भरती-ओहोटी पाहूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


मुंबई लोकल ‘फास्टट्रॅक’ वर; पुढील ५ वर्षांत ७४९ नव्या फेऱ्यांचे नियोजन

   Follow us on        

मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पुढील पाच वर्षांत एकूण ७४९ नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत, २०३० पर्यंत रेल्वेची प्रवासी वहन क्षमता दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

​नव्या फेऱ्यांचे असे आहे गणित:

​प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, दोन्ही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे:

मध्य रेल्वे: सध्या १८१० फेऱ्या असून, ५८४ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे.

पश्चिम रेल्वे: सध्या १४०६ फेऱ्या असून, १६५ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आहे.

​याशिवाय, मुंबईतून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे. मध्य रेल्वेवर सध्या ८२ मेल-एक्स्प्रेस असून त्यात ६८ वाढीव गाड्या, तर पश्चिम रेल्वेवर सध्या ४४ गाड्या असून ६५ वाढीव गाड्यांचे नियोजन आहे.

​पायाभूत सुविधांवर भर

​हे नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत.

​मेगा टर्मिनस: पनवेल-कळंबोली, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि परळ येथे नवीन मेगा टर्मिनस उभारले जात आहेत.

​प्लॅटफॉर्म विस्तार: विद्यमान स्थानकांवर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे आणि नवीन रेल्वे मार्गिका (Lines) उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.

​नव्या मार्गिका: एकूण २२ नवीन प्लॅटफॉर्म आणि ३६ नवीन मार्गिकांमुळे गाड्यांचे संचलन अधिक सुलभ होईल.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार खातीपुरा – मडगाव स्पेशल एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway Updates: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि पर्यटकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता उत्तर-पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. खातीपुरा (जयपूर) ते मडगाव जंक्शन (गोवा) दरम्यान विशेष शुल्कासह ‘वन-वे’ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना गोव्याला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

गाडी क्र. 09701 खातीपुरा – मडगाव स्पेशल: ही गाडी २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी खातीपुरा येथून संध्याकाळी १६:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०४:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 09702 मडगाव – खातीपुरा स्पेशल: ही गाडी ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी मडगाव जंक्शन येथून पहाटे ०५:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १६:१५ वाजता खातीपुरा येथे पोहोचेल.

थांबे:

​ही ट्रेन प्रवासादरम्यान जयपूर जंक्शन, किशनगड, अजमेर जंक्शन, बिजायनगर, भिल्वाडा, चित्तोडगड, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड जंक्शन, पनवेल जंक्शन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या  स्थानकांवर थांबेल.

गाडीची संरचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील. यामध्ये:

​AC २ टायर: २ कोच

​AC ३ टायर: ८ कोच

​AC ३ टायर इकॉनॉमी: २ कोच

​स्लीपर क्लास: ४ कोच

​द्वितीय श्रेणी आसन: २ कोच

​जनरेटर कार: २ कोच

या गाडीच्या अधिकृत वेळेसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Konkan Railway: महाराष्ट्राची ‘तुतारी’ गोवा राज्यात पळविण्याचा डाव

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: गेल्या दहा वर्षांपासून आपल्या हक्काच्या रेल्वे टर्मिनससाठी संघर्ष करणाऱ्या कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करण्याऐवजी, आता चक्क महाराष्ट्राची हक्काची ‘तुतारी एक्सप्रेस’ गोवा राज्यात पळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाचा हा आडमुठेपणा म्हणजे कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याची संतप्त भावना सध्या तळकोकणात उमटत आहे.

​प्रशासनाची ‘टर्मिनस’ टाळण्यासाठी नवी खेळी?

​सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्थानिक जनता आणि प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी नवीन तांत्रिक कारणे पुढे करून हे काम रेंगाळत ठेवत आहे. आता तर “टर्मिनस अपूर्ण आहे” असे लंगडे समर्थन देत तुतारी एक्सप्रेस गोव्यापर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे. मुळात टर्मिनसचे काम पूर्ण होऊच नये आणि ही गाडी कायमस्वरूपी राज्याबाहेर घालवावी, हीच प्रशासनाची छुपी खेळी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

​हा केवळ गाडीचा नाही, कोकणच्या अस्मितेचा प्रश्न!

​तुतारी एक्सप्रेस ही केवळ एक गाडी नसून ती कोकणी माणसाची जीवनवाहिनी आणि हक्काची एक्सप्रेस आहे. ही गाडी पुढे नेणे म्हणजे सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय. प्रशासनाचा हा दृष्टिकोन कोकणच्या विकासाला दुय्यम स्थान देणारा असून, स्थानिक जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे.

सरकारी दाखला पाहिजे असेल तर आधी एक झाड लावा; सावंतवाडीतील ग्रामपंचायतीचा ‘सही’ निर्णय

   Follow us on        

सावंतवाडी: पर्यावरण रक्षणासाठी केवळ भाषणे न देता प्रत्यक्षात कृती कशी करावी, याचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीने घालून दिला आहे. गावात विवाह नोंदणी असो किंवा मृत्यूचा दाखला, यांसारखी महत्त्वाची सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी आता एक वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

​काय आहे हा उपक्रम?
गावचे सरपंच श्रीमती मिलन पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नावीन्यपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ​ या निर्णयानुसार, गावातील नवीन विवाहित जोडप्याला आपला विवाह नोंदणीचा दाखला हवा असल्यास, त्यांना एक फळझाड किंवा सावली देणारे झाड लावावे लागेल. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वारसांना एक झाड लावावे लागेल, तरच मृत्यूचा दाखला दिला जाईल.

हे दाखले मिळविण्यासाठी झाड लावल्यानंतर त्याचा फोटो ग्रामपंचायतीत जमा करावा लागणार आहे. या उपक्रमामुळे गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढण्यास मदत होणार आहे.

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) यावर मात करण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न करणे अशी ​या निर्णयामागची भूमिका आहे तसेच येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा आणि हिरवेगार गाव मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

​मळेवाड-कोंडूरे ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. प्रशासकीय कामाची सांगड पर्यावरणाशी घालणारा हा राज्यातील पहिलाच किंवा अत्यंत दुर्मिळ असा प्रयोग मानला जात आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी “इतर ग्रामपंचायतींनीही या मॉडेलचा स्वीकार करावा,” अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा (कोच) कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

​या निर्णयामुळे या गाडीची एकूण क्षमता आता १५ कोचवरून वाढून १६ एलएचबी (LHB) कोच इतकी झाली आहे. नव्या बदलांनुसार गाडीमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.

​सुधारित कोच रचना खालीलप्रमाणे असेल:

​२ टायर एसी: ०१ कोच

​३ टायर एसी: ०२ कोच (आधी १ होता)

​३ टायर इकॉनॉमी: ०१ कोच

​स्लीपर क्लास: ०६ कोच

​जनरल डबे: ०४ कोच

​जनरेटर कार: ०१

​SLR कोच: ०१

​नवीन बदल कधीपासून लागू होणार?

​रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन हा बदल खालील तारखांपासून अंमलात आणण्यात येणार आहे.

१. गाडी क्र. २२६२९ (तिरुनेलवेली ते दादर): २४ डिसेंबर २०२५ पासून.

२. गाडी क्र. २२६३० (दादर ते तिरुनेलवेली): २५ डिसेंबर २०२५ पासून.

​दक्षिण रेल्वेच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना, विशेषतः वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुका २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाने आपली कंबर कसली असून, प्रचारासाठी ४० ‘स्टार प्रचारक’ नेत्यांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाहीर करण्यात आली असून, यात दिग्गज नेत्यांपासून ते युवा चेहऱ्यांपर्यंत सर्वांना स्थान देण्यात आले आहे.

​प्रचाराची धुरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर

​या यादीत पहिले नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यासोबतच पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तीकर आणि आनंदराव अडसूळ हे देखील प्रचाराचे मुख्य आकर्षण असतील.

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

यादीतील प्रमुख नावे:

​शिवसेनेने या यादीत अनुभव आणि तरुण रक्त यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे आहेत:

​कॅबिनेट मंत्री: गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर.

​खासदार: डॉ. श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, मिलिंद देवरा, आणि नरेश म्हस्के.

​महिला नेतृत्व: डॉ. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि शयना एन.सी.

​इतर महत्त्वाचे चेहरे: संजय निरुपम, नीलेश राणे आणि प्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा.

शिवसेना स्टार प्रचारक संपूर्ण यादी (२०२५-२६)

​१. मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री)

२. श्री. रामदास कदम (नेते)

३. श्री. गजानन कीर्तीकर (नेते)

४. श्री. आनंदराव अडसूळ (नेते)

५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते)

६. श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय मंत्री)

७. डॉ. नीलमताई गोऱ्हे (नेत्या)

८. सौ. मिनाताई कांबळी (नेत्या)

९. श्री. गुलाबराव पाटील (नेते व मंत्री)

१०. श्री. दादाजी भुसे (उपनेते व मंत्री)

११. श्री. उदय सामंत (उपनेते व मंत्री)

१२. श्री. शंभूराज देसाई (उपनेते व मंत्री)

१३. श्री. संजय राठोड (मंत्री)

१४. श्री. संजय शिरसाट (प्रवक्ते व मंत्री)

१५. श्री. भरतशेट गोगावले (उपनेते व मंत्री)

१६. श्री. प्रकाश आबिटकर (मंत्री)

१७. श्री. प्रताप सरनाईक (मंत्री)

१८. श्री. आशिष जयस्वाल (राज्यमंत्री)

१९. श्री. योगेश कदम (राज्यमंत्री)

२०. श्री. दिपक केसरकर (प्रवक्ते व आमदार)

२१. श्री. श्रीरंग बारणे (उपनेते व खासदार)

२२. श्री. धैर्यशील माने (खासदार)

२३. श्री. संदीपान भुमरे (खासदार)

२४. श्री. नरेश म्हस्के (खासदार)

२५. श्री. रवींद्र वायकर (खासदार)

२६. श्री. मिलिंद देवरा (खासदार)

२७. डॉ. दीपक सावंत (उपनेते व माजी मंत्री)

२८. श्री. शहाजी बापू पाटील (उपनेते व माजी आमदार)

२९. श्री. राहुल शेवाळे (उपनेते व माजी खासदार)

३०. डॉ. मनिषा कायंदे (सचिव व आमदार)

३१. श्री. निलेश राणे (आमदार)

३२. श्री. संजय निरुपम (प्रवक्ते)

३३. श्री. राजू वाघमारे (प्रवक्ते)

३४. डॉ. ज्योती वाघमारे (प्रवक्ते)

३५. श्री. पूर्वेश सरनाईक (युवासेना कार्याध्यक्ष)

३६. श्री. राहुल लोंढे (युवसेना सचिव)

३७. श्री. अक्षयमहाराज भोसले (शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना)

३८. श्री. समिर काझी (कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग)

३९. श्रीमती शयना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या)

४०. श्री. गोविंदा आहुजा (माजी खासदार)

संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जामनगर’ आणि ‘पोरबंदर’ एक्सप्रेसचे होणार जंगी स्वागत

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेच्या पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना आता संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​गुजरातकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. आता थेट प्रवासाची सोय झाल्याने वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.

​जंगी स्वागताची तयारी

​या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिकांनी जय्यत तयारी केली आहे. पोरबंदर एक्सप्रेसचे शुक्रवारी तर जामनगर एक्स्प्रेसचे शनिवारी स्वागत करण्यात येणार आहे. ​या दोन्ही दिवशी रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजरात आणि फुलांच्या हारांनी गाड्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​फेसबुक ग्रुपचे जाहीर आवाहन

​’निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सर्व नागरिकांनी संगमेश्वर रोड स्थानकावर उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या स्थानकांवर आता २४x७ ‘डिजी लॉकर’ सुविधा उपलब्ध

   Follow us on        

मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत आणि प्रवाशांच्या सोयीत भर घालत मध्य रेल्वेने आता रत्नागिरी (महाराष्ट्र), थिविम (गोवा) आणि उडुपी (कर्नाटक) स्थानकांवर २४ तास ‘डिजी लॉकर’ (डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम) सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वयंचलित असलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

​काय आहे ही ‘डिजी लॉकर’ सुविधा?

​मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण ५६० डिजी लॉकर आहेत (CSMT-३००, दादर-१६०, LTT-१००).

​सामान ठेवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. स्क्रीनवर ‘Start-Store’ वर क्लिक करा.

२. आपले नाव, PNR क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

३. लॉकरचा आकार आणि बॅगांची संख्या निवडा.

४. प्रति बॅग ३० रुपये याप्रमाणे मशीनमध्ये पैसे जमा करा.

५. लॉकर उघडेल, त्यात सामान ठेवून दरवाजा बंद करा.

​सामान परत मिळवण्यासाठी:

१. स्क्रीनवर ‘Start-Retrieve’ वर क्लिक करा.

२. पावतीवरील बारकोड स्कॅनरला दाखवा.

३. लॉकर उघडेल, आपले सामान घेऊन दरवाजा पुन्हा बंद करा.

​प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

​ही सुविधा प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या माहितीनुसार या काळात डिजी लॉकर्सच्या माध्यमातून रेल्वेला ३१.६ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

पर्यटकांची सोय 

आता ही सुविधा कोकणात सुरू केल्याने येथे पर्यटनास येणार्‍या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल. जास्त सामान घेऊन फिरणे गैरसोयीचे असल्याने ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येणार आहे. अशी सुविधा कोकण रेल्वे मार्गावरील ईतर स्थानकावर सुरू करणे गरजचे आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search