मुंबई: अॅप-आधारित टॅक्सी कंपन्यांकडून होणारी पिळवणूक आणि अन्यायाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील तीन कॅब चालकांनी सुमारे १५० किलोमीटरचा पायी प्रवास करून मुंबई गाठली आहे. परमेश्वर घोंगे, संतोष दुर्गे आणि वैभव भेगडे या ‘महाराष्ट्र कामगार सभे’शी संबंधित चालकांनी १० एप्रिल रोजी पुण्याहून या ‘न्याय पदयात्रे’ला सुरुवात केली होती. तळपत्या उन्हात, पायाला फोड येऊनही केवळ निर्धाराच्या जोरावर लोणावळा, खालापूर, पनवेल आणि वाशीमार्गे त्यांनी बुधवारी मुंबईत प्रवेश केला. हे चालक १५ एप्रिल रोजी आझाद मैदानावर पोहोचून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश कंपन्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करणे हा आहे. आंदोलक चालकांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या सरकारनं ठरवून दिलेल्या भाडेदरांचे पालन करत नाहीत. याशिवाय, ‘पॅनिक बटण’च्या नावाखाली चालकांकडून वारंवार केली जाणारी कपात, कमिशनमधील पारदर्शकतेचा अभाव आणि मुंबई-नागपूर सारख्या शहरांत विनापरवाना सुरू असलेल्या ‘बाईक टॅक्सी’मुळे होणारे नुकसान यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की, हा लढा चालकांच्या हक्कासाठी असून जोपर्यंत शासन यावर ठोस पाऊल उचलत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील. दरम्यान, परिवहन विभागाने या कंपन्यांना नियमांचे पालन करण्याचे आदेश वारंवार दिले असल्याचे सांगत, कंपन्या एकमेकांवर बोट ठेवून जबाबदारी टाळत असल्याचा दावा केला आहे.


